कविवर्य
विश्वनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट
(२५ जुलै, इ.स. १९२२ - २७ सप्टेंबर, इ.स. २००२)
जीवन
बापटांचा जन्म २५ जुलै, इ.स. १९२२ रोजी महाराष्ट्रात कर्हाड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. त्यानंतर 'नॅशनल कॉलेज आणि 'रामनारायण रूईया कॉलेज' हया महाविद्यायलयांतून मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक होते. इ.स. १९७४ पासून मुंबई विद्यापीठातील गुरूदेव रवींद्र टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते. बापट भारताच्या स्वांतत्र्यलढ्यातही सहभागी झाले होते. इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत ते सहभागी होते. ऑगस्ट, इ.स. १९४३ ते जानेवारी, इ.स. १९४५ पर्यंत ते तुरूगांत होते. इ.स. १९४७ ते इ.स. १९८२ ते पर्यंत ते मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक होते. इ.स. १९८३ ते इ.स. १९८८ ते साधना नियतकालिकाचे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते सलंग्न होते. इ.स. १९७२ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. लहानपणापासून बापटावर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. 'बिजली' हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा' , 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहील्या.
पौराणिक एतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली `केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची सकीना उर्दूचा खास लहेजा होऊन प्रकटली आणि, `तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा, सांगून गेली.
इ.स. १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. इ.स. १९७७, इ.स. १९९३ मध्ये अमेरिकेत आणि इ.स. १९९२ मध्ये आखाती देशांत त्यांचा काव्यदर्शन कार्यक्रम झाला. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह, तर बालगोविंद हे बालनाट्य लिहिले.
कविराज वसंत बापट
अखंड लेखनाची बोलण्याची हौस असलेले माणसांचे लोभी राष्ट्रप्रेमी श्री. वसंत बापट यांचा जन्म ज्या काळात झाला तो काळ तसा पुराणमतवादी होता. म्हणजेच २५ जुलै १९२२ साली झाला. पण लहानपणापासूनच त्यंनी आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. निर्भीड बाणेदारपणा हा वसंत बापट यांचा एक गुण असला तरी त्यापेक्षाही त्यांची साहित्य सेवा अधिक स्मरणात राहण्यासारखी आहे. त्यांना साहित्यीक किंवा साहित्य यांची अवहेलना केलेली अजिबात आवडत नसे. मराठीत राविकीरण मंडळानंतर काव्यवाचनाची आवड लोकांच्यात ज्यांनी निर्माण केली त्यात विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांच्या बरोबर वसंत बापट यांचा वाटाही मोलाचा आहे.
वसंत बापट यांचा लोकवांड़मायाचा अभ्यास दांडगा होता. त्यामुळे त्यांनी तितक्याच कासोशीने आधुनिक लावण्या लिहिल्या. त्यातून त्यांनी खट्याळ शृंगार फुलविला. महाराष्ट्र दर्शन पाठोपाठ भारत दर्शन, आझादी कि जंग आदि कार्यक्रमांचे लेखन केले. ह्या कार्यक्रमांसाठी माहिती जमविण्यासाठी किंवा नंतर कार्यक्रम सादर करण्यासाठी वसंत बापट ह्यांनी प्रचंड भटकंती केली. या भाटकंतीचे अनुभव त्यांनी बारा गावचे पाणी या प्रवासवर्णनातून सांगितले आहेत.
‘विसाजीपंतांची बखर’ या ग्रंथातील बखर वाड़मायाच्या शैलीचा अविष्कार विलक्षण आहे. बापट यांच्या सर्वच कविता गाजल्या. अनेक काव्यसंग्रह लोकप्रिय आहे. सन १९५१ सालचा पहिला ‘बिजली’ या काव्यसंग्रहातून सुरु झालेला त्याचा काव्यप्रवास सन १९९३ चा ‘रसिया’ या नवीन काव्यासंग्रहापर्यंत कायम होता.
जर का पटली असती परवल
जर उलगडली असती भाषा
तर माझ्या विव्हळ गीतांना
जन्मायाची नव्हती आशा
अश्या अनेक प्रकारच्या कविता त्यांनी लिहिल्या. गद्यलेखन, नाट्यलेखन, व्यक्तिचित्रे, समीक्षण, उपहासात्मक राजकीय लिखाण केला. तरी रसिकांच्या मनात कवी हीच त्यंची प्रतिमा नेहमी होती. वसंत बापटांचे गद्य लेखनही चांगले होते. त्यांनी काही ज्येष्ठ व्यक्तिंच्यावर लिहिलेले मृत्युलेख ‘जिंकुनी मरणाला’ या समर्पक शीर्षकाच्या पुस्तकात समाविष्ट केले आहे. महात्मा गांधी, साने गुरुजी, बालगंधर्व, आचार्य अत्रे अश्या महान माणसांनी आपल्या कर्तृत्वाने मारणालाही जिंकून घेतले आहे. त्यांच्या या कार्याचा व्यक्ती म्हणून त्यांच्यात असलेल्या विशेषांच्या आणि त्यांनी समाजात दिलेल्या योगदानाचा वेधक भावस्पर्शी आणे तरीही काहीशा तटस्थ भावनेने घेतलेला हा वेध बापटांच्या लेखनशैलीचे खरे दर्शन घडविणारा आहे.
गेल्या पन्नास वर्षात साहित्याच्या अनेकानेक प्रांतात मुक्त संचार केला. सेतू, साकीना, अकरावी दिशा, मानसी, तेजासी, राजसी अशा अनेक संग्रहातील त्यंच्या कवितांचे असंख्य रंग ठळकपणे दिसतात. ही कविता आपल्या अनुभूतीशी प्रामाणिक आहे. सर्व जग पाहू इच्छिणारे त्यांचे उत्साही मन सतत नवे नवे शोधात पुढे पुढे झेपावत राहिले. त्यांना खेळात रस होता. वेगवेगळ्या महाविद्यालयात, शेवटी मुंबई विद्यापीठात संस्कृत व मराठी याचे त्यांनी अध्यापन केले. १९४२ च्या स्वत्रांत्य लढ्यात त्यांचा सहभाग होता. शब्दांची, अभिनयाची व रसिक मनांची त्यांना अचूक पारख होती. त्यांनी हाती घेतले त्याचे सोने केले. अखंड मुलामाणसात रमणारे, मैफिलीत खुलणारे, गुणग्राही सौदर्यासक्त मन त्यांना लाभले होते. जीवनाकडे पाहण्याची त्यंची दृष्टी त्यांनी आपल्या असंख्य विद्यार्थ्यांना दिली.
वसंत बापट यांच्याबद्दल कितीही लिहिले तरी थोडेच. कविमनाचे असे हे साहित्यिक होते. पण केवळ साहित्यिकच नव्हते तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाची जपणूक करणारे रसिक मनाचे अस्सल मराठमोळे व्यक्तिमत्व होते. २००२ साली प्रसिद्ध झालेले ‘शतकाच्या सुवर्णमुद्रा’ हे त्यंचे पुस्तक अखेरचे ठरले.
जाण्याआधीही आपल्या मृत्यूचे सुचून त्यांनी एका विलक्षण कवितेने साहित्य संमेलनातच करून ठेवले होते. आजही त्या काव्यपंक्ती वाचताना मन कातर होते. त्याच काव्यपंक्तींनी ह्य लेखाचा शेवट करणे योग्य ठरेल. कविराज म्हणतात –
तुम्ही जीव लावला – मैत्र अपुले जुने
केलेत माफ तुम्ही शंभर माझे गुन्हे
हे एकच आता अखेरचे मागणे
रे मैफल तुमची अखंड चालो अशी
आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी
- कु. अस्मिता श्रीकांत बापट
लाक्ष्मिकेशव अपार्टमेंट, नारायण पेठ, पुणे
मो. ९४२०८४१६०१
अपलोड केल्याची तारीख : १२ ऑक्टोबर २०१२
स्नेहबंध २००९ च्या अंकात प्रसिद्ध