रुपी बँकेचा गुंता
सहकार खात्याकडून ( आयुक्त श्री चंद्रकांत दळवी यांनी काढलेल्या ) आलेल्या नवीन आदेशानुसार रुपी बँकेची घडी नीट बसविण्यासाठी श्री.मुकुंदराव अभ्यंकर आणि इतर दोघांसह प्रशासकीय मंडळाची नेमणूक झाली आहे. बँकिंग क्षेत्राशी संबंधित अशा या व्यक्तींच्या समोर कर्ज-वसुली , खातेदारांच्या आर्थिक गरजा भागविण्याचा मार्ग स्थापित करणे, आणि बँकेची प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देणे अशी आव्हानात्मक कामे आहेत. आपापल्या अनुभवाच्या आणि लोक-संग्रहाच्या माध्यमातून या त्रिकुटाला यश मिळो आणि सर्व खातेदार, ठेवीदार आणि हितचिंतकांच्या नशीबाने आनंदाच्या पर्जन्यधारांची बरसात होवो या शुभेच्छ्या !
बँकेवर संकट येणे (नव्हे ओढवून घेणे) हा प्रकार नवीन नाही. सांगली बँक (आय् सी आय् सी आय मध्ये -२००७ एप्रिल ), युनायटेड वेस्टर्न (आय डी बी आय मध्ये- २००६ सेप्टेम्बर ) , सुवर्ण सहकारी (आय ओ बी मध्ये – २००९ एप्रिल ), वसंतदादा सहकारी(अवसायनात- परवाना रद्द २००९ जानेवारी), सद्गुरू जंगली महाराज व नवजीवन नागरिक सहकारी (टी जे एस बी मध्ये) अशी आधीची अनेक उदाहरणे आहेत. काही “जिल्हा सहकारी” बँकांबद्दल कुरबूर ऐकू येतेच आहे. कधी आणि कोणती कारवाई होणार ? रुपी सुद्धा कोणीतरी घेईल असे वाटत होते. पण तसे अजून झाले नाही. बातम्यांवरून कळते की एकूण येणे रकमेत मुद्दलापेक्षा व्याजाचाच आकडा मोठा आहे. प्रश्न आहे हे कसे घडले ? कोणी घडू दिले ? वेळच्यावेळी घंटानाद का केला गेला नाही ? आता तरी यापैकी जास्ती-जास्त येणी लवकरात-लवकर वसूल होवोत अशी अपेक्षा धरू या.
याच पद्धतीने राज्य आणि केंद्र सरकारातील गैर व्यवहार वेळच्या वेळी का चव्हाठ्यावर आले नाहीत ; आणि यापुढे कोणती खबरदारी घेण्यात येईल हे स्थापित करणे महत्वाचे आहे. लवकरच तसे घडो अशी आशा करू या.
रुपीच्या काही ग्राहकांना विविध वाहिन्यांवरील प्रतिनिधींशी बोलताना ऐकल्यावर बँकेच्या नवीन अधिकाऱ्यांना एक सुचवावेसे वाटते की ग्राहकांच्या काही अत्यावश्यक गरजांसाठी संबंधित संस्था/आस्थापन यांना चेक किंवा ड्राफ्टने पैसे देण्याची सवलत मिळाल्यास त्यांचेच पैसे त्यांच्या कामास येतील. उदाहरणार्थ :- शाळा-कॉलेजची फी, दवाखान्याचे बिल, वीज-बिल, महापालिकेचा कर, विमा-हप्ता, गृह-कर्जाचा हप्ता, लग्न-कार्यापैकी काही खर्च ई. अशा प्रकारची टाळता न येण्यासारखी देणी देणे. अशा सुविधेचे बँकेचे ग्राहक नक्कीच स्वागत करतील असे वाटते. अर्थात अशा रकमेची मान्यता खातेदारानुसार वेगवेगळी असू शकेल हे वेगळे सांगणे नलगे.
प्रमोद द बापट,
पुणे-९,
२९-०५-२०१५
( वरील बॅंकांच्या कारवाईच्या तारखा इंटर-नेट वरून घेतल्या आहेत )