बापट कुलसम्मेलन २०१५ : बेळगाव

बेळगावात बापट रंगले कुलसंमेलनात!!!

डॉ. रवी बापट व डॉ. विष्णू बापट यांना बापट कुलरत्न !!!!!

दर दोन वर्षांनी नेहमीच नाविन्य घेऊन येणारे बापट कुलसंमेलन यंदा चक्क कर्नाटक राज्यात आणि सीमा प्रश्न धुमसत असणाऱ्या बेळगावात रविवार दिनांक २५ जानेवारी २०१५ रोजी भरले होते. बापट परिवार चँरीटेबलट्रस्ट,पुणे तर्फेआयोजीत केल्या जाणाऱ्या या कुलसंमेलनात दरवर्षी नवनवीन उपक्रम केले जातात. यंदा बेळगाव निवासी आठ ते दहा बापट कुटुंबीयांनी एकत्र येऊन श्री. प्रकाश बापट व त्यांची पत्नी सौ. पद्मजा बापट यांच्या मार्गदर्शनाखाली हे सातवे कुलसंमेलन आयोजीत केले होते.

मुळात बापट कुलाचा पसारा मोठा. संपूर्ण जगात पसरून राहिलेल्या बापटांना एकत्र आणून संमेलन संपन्न करणे म्हणजे गोवर्धन पर्वत उचलण्याइतकेच मोठे काम, परंतु हा कुलासंमेलानाचा गोवर्धन या बेळगाव निवासी आठ ते दहा बापटांनी नुसता उचललाच नाहीतर प्रारंभापासून शेवटपर्यंत छान तोलून आणि पेलून धरला. आदल्या दिवशीच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून, सकाळच्या ईडली सांबार व बेळगावी चुंद्याच्या नाश्त्यासह दुपारच्या खास बेळगावी मांड्यांच्या सुग्रास भोजनापर्यंत खुपच छान अशी व्यवस्था या बापटबंधूंनी केली होती.

मराठी माणूस जेव्हा घराबाहेर पडून परप्रांतात जातो तेव्हा तो अधिकच एकजूट दाखवतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे कुलसंमेलन होते कारण, हे कुलसंमेलन जरी बापटांचे असले तरी बेळगावात असणारे बहुसंख्य चित्पावन कोकणस्थ आपल्या अडचणी बाजूला ठेवून आलेल्या सर्व बापटांच्या स्वागताला आणि मदतीला पुढे सरसावले होते. अर्थात बेळगावच्या चित्पावन संघाने याआधीही एक मोठे कोकणस्थ चित्पावन संमेलन छान प्रकारे आयोजित करून संपन्न केले होते आणि त्याच्या स्मृतींना आजच्या या संमेलनामुळे उजाळा मिळाला. रविवारी २५ जानेवारी रोजी खास ईडली सांबार व बेळगावी चुंद्याचा आस्वाद घेऊन सर्व बापट बंधु भगिनी लोकमान्य टिळक रंगमंदिर म्हणजे जुन्या रीटस् टाँकीज मध्ये एकत्र आले.

सकाळच्या सुखद गारव्यामुळे छानश्या सनईच्या सुरावटीमध्ये आणि रांगोळ्यांनी सजविलेल्या परिसरामध्ये उत्साही वातावरणात या संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले. भगवान परशुराम, श्री देवी अंबेजोगाई योगेश्वरी,श्री देव व्याडेश्वर, सेनापती बापट यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. बापट परिवार चँरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती विद्याताई बापट, स्वागताध्यक्ष श्री. प्रकाश बापट यांनी उद्घाटन केले. सर्व उपस्थितांचे आणि मान्यवरांचे स्वागत कुमारी मधुरा बापट हिच्या सुरेल आवाजातील स्वागतगीताने झाले. याचवेळी बेळगावी राहणाऱ्या बापटशात्री यांनी रचलेल्या परशुराम गीताचे गायन सौ. पद्मजा बापट यांनी केले. यामुळे वातावरणनिर्मिती सुंदररीत्या झाली. स्वागत व प्रास्ताविकानंतर ट्रस्टचे उद्देश,कार्यक्रम,कार्यपद्धती,समाजाभिमुख होणारे काम, भविष्यातील होणारे काम, भविष्यातील वाटचाल आदी बाबींवर चर्चा, मतप्रदर्शन झाले. ट्रस्टला श्रीमती.कुसूम बापट व इतर अनेक मान्यवरांनी, बापटबंधूंनी सामाजिक कामासाठी देणग्या दिल्या.

बापट संमेलन हे नेहमीच बापटांपुरते मर्यादित न राहता सर्वांचेच होऊन जाते याचा पुन्हा एकदा बेळगाव येथे प्रत्यय आला. २००९ साली चिपळूण संमेलनात सुरु झालेली बापटेतर व ब्राह्मणेतर सामाजघटकांचासन्मान करणे ही प्रथा बेळगाव कुलसंमेलनातही जपण्यात आली. श्री. शरद पवारांचे निकटवर्तीय आणि कौटुंबिक डॉक्टर असणारे, वैद्यकीय सल्लागार असणारे, वैद्यकीय क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करणारे, “वाँर्ड नंबर ५”, “पोस्टमार्टेम” अशासारखी दर्जेदार पुस्तके लिहिणारे डॉ. रवी बापट, तसेच बेंगलोर येथील वैद्यकीय क्षेत्रात तितकीच भरीव कामगिरी करणारे, स्त्रीरोगांवर संशोधन करून रामबाण औषधांची निर्मिती करणारे औषध निर्माते श्री. विष्णू बापट या दोघांना मानाचा बापट कुलरत्न पुरस्कार देण्यात आला व त्यांना सन्मानित करण्यात आले. या दोघांनीही आपले मनोगत व्यक्त करताना आपणासार्वांच्या पाठबळामुळे, आशीर्वादांमूळेच आणि बापट कुलाच्या अभिमानामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो असे सांगितले.

यानंतर समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आले. गुणी विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.श्रीमती परांजपे यांनी अपंगांसाठी स्वतः अपंग असूनही चालविलेल्या कार्याबद्दल व गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या कामाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री. याळगी यांनी सेनापती बापट यांच्या सहवासामुळे प्रेरणा घेऊन बेळगावात ते करीत असलेल्या प्रचंड सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी त्यांना गौरविण्यात आले. श्री. गिरीश तेलकर आणि त्यांचे कुटुंबीय एका बापट नावाच्या महात्म्याच्या ५०० वर्षांपूर्वीच्या समाधीची आजही श्रद्धापूर्वक रोज पूजा करतात,दिवाबत्ती करतात म्हणून त्यांचा सत्कार या संमेलनात करण्यात आला. श्रीमती. कुसुम बापट यांनी कीर्तन परंपरेत केलेली कामगिरी आणि सामाजिक काम यासाठी त्यांचाही सन्मान करण्यात आला. याचवेळी एक उचित आणि वेगळा पण अत्यंत आवश्यक असणारा सन्मान कराण्यात आला तो श्री. शिवाजी छ्त्राप्पा कांगणीकर या स्वातंत्र्यसेनानी, सेनापती बापट व साने गुरुजींच्या अनुयायी भक्ताचा. साने गुरुजी आणि सेनापती बापट यांच्या आचार विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या सहवासामुळे प्रेरणा घेऊन त्यांची विचारसरणी, आचरण यांचे अनुकरण करीत हजारो अनपढ अशिक्षितांना त्यांनी शिक्षणाचा लाभ मिळवून दिला. स्वच्छता, शिक्षण याचे कार्य आजही सायकलवर फिरून आणि कर्नाटकातील दुर्गम जंगलमय भागात पायी फिरून त्यांनी चालू ठेवले आहे. अत्यंत साधी विचारसरणी, सानेगुरुजींसारखी वेशभूषा असणाऱ्या धनगर समाजातील या माणसाने त्याकाळी म्हणजेच शिक्षणाच्या फारश्या सोई नसताना बी.एस.सी. हे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. आजही ते गावागावात स्वच्छतादूत म्हणून फिरत आहेत. बेळगावातील मकरंद बापट यांच्या घराण्याशी स्नेह असणाऱ्या या माणसाची कृती समाजाला मानदंड ठरणारी असून त्यांची प्रसिद्धी पराड्मुखता माणसाला अंतर्मुख करायला भाग पाडते. अशा व्यक्तीचा सन्मान करून बेळगावकर बापटांनी एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आणि त्यामुळे हे संमेलन एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचवले.

मी मंगेश बापट, आनंद उर्फ नंदू बापट, श्री.अरविंद व सौ.सुलाभा बापट, श्री.आनंद मधुकर बापट, प्रशांत व प्राची बापट, श्री.श्रीकान्त व सौ. शीला बापट, श्री. गजानन बापट, श्री. चंद्रशेखर बापट व सारथी संजय मोघे असे बारा चिपळूणकर या संमेलनात सहभागी झालो होतो. ट्रस्टचे काम जास्तीतजास्त लोकाभिमुख व गतीमान व्हायला हवे आणि त्यासाठी तरुणाईने जास्तीतजास्त भाग घेतला पाहिजे असे मत श्री. श्रीकान्त बापट यांनी मांडले. दै. सागरचे पडछाया सदराचे लेखक कै.मोहन तथा अप्पा सलागरे यांच्या श्री. चंद्रकांत दादा चितळे यांनी संकलित केलेल्या निवडक पडछायांचे पुस्तकाची मंगेश बापट यांनी माहिती दिली व “बापट रंगले कुलसंमेलनात” ही २००९ ची पडछाया हे पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे हे सर्वांना ज्ञात करून दिले तेव्हा सर्वांनी आनंद व्यक्त केला.

दुपारच्या वेळी खास बेळगावी मांड्यांच्या भोजनात चित्रान्न, अननसाचे रस्सम याचा आस्वाद सर्वांनी घेतला. संमेलनाच्या उत्तरार्धात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यात प्रा. विसुभाऊ बापट यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार विनोदी कविता सादर करून उपस्थितांची हसवणूक केली. मध्यप्रदेशातील श्री. विनायक बापट यांची शिवचारीत्रावरील गाणी रसिकांची दाद मिळवून गेली. या संमेलनाच्या यशस्वीतेकरता बेळगाव व आसपासच्या सर्व कुटुंबीयांनी सुमारे सहा महिन्यांपासून दहा ते पंधरा बैठका घेऊन तरुण मुलामुलींच्या मदतीने सर्व कार्यक्रमांची आखणी केली व बेळगावसारख्या ठिकाणी हे संमेलन यशस्वी केले. बागलकोट, तालीकोट, बदामी, बेंगलोर, म्हैसूर, हुबळी, धारवाड, सागर, सौरभ, हत्तरगी, बिजापूर, गोवा, कोकण, सिंधुदुर्ग, आजरा, कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, कराड, चिपळूण, पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून सुमारे २०० बापट कुलबान्धव या संमेलनासाठी उपस्थीत राहिले. ठिकठिकाणच्या बापट कुलाबान्धवांना एकत्र येण्याकरीता विविध प्रांतात बापट कुलासंमेलने घ्यावीत असे सर्वानुमते ठरविण्यात आले व मध्यप्रदेशचे श्री. विनायक बापट यांनी मध्यप्रदेशात आम्ही असे संमेलन भरविण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

तसेच यापुढील संमेलन २०१७ मध्ये देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्याचा विचार आहे असे देवगडचे श्री. अनुप बापट यांचेवतीने ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती. विद्याताई बापट यांनी जाहीर केले. सर्वांनी दोन्ही घोषणांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. श्री. महादेव बापट यांनी संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत भरली. ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रा. गौतमजी बापट यांनी ट्रस्टबाबत काही सूचना करून आभारप्रदर्शन केले. सौ. पद्मजा बापट यांच्या पसायदानाने संपूर्ण कुलसंमेलनाची सांगता झाली आणि पुन्हा २०१७ साली देवगड येथे भेटूया असा संकल्प करून प्रत्येक बंधुभगिनी या गोड आठवणी बरोबर घेऊन आपल्या गावी प्रस्थान करते झाले.

मंगेश दत्तात्रय बापट,चिपळूण