बापट कुलसम्मेलन २०२२ : विष्णुकृपा हॉल, पुणे
सर्व बापट कुलबंधू,भगिनी आणि माहेरवाशिणींना नमस्कार…
कळविण्यास आनंद होत आहे की आपण आपले १० वे कुलसम्मेलन रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी, विष्णुकृपा हॉल, शनिवार पेठ, पुणे ४११०३० या ठिकाणी आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. सदर संमेलनात बापटकुलातील माहेरवाशिणींनाही सहभागी करावयाचे आहे. त्यांच्यापर्यंत आम्ही वैयक्तिक पोहचू शकत नसल्याने प्रत्येक कुटुंब प्रमुखाने माहेरवाशिणींना आमच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देऊन सर्व कार्यक्रमांत सहभागी करुन घ्यावे, ही विनंती. संमेलनाची वेळ सकाळी ९.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत असेल. दिनांक ११ डिसेंबर रविवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. त्यादिवशी साधारण पणे बऱ्याच मंडळींचा उपवास असतो त्यामुळे आपण भोजन व न्याहरी मध्ये उपवासाचे, फराळाचे तसेच ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी सर्वसाधारण पदार्थांचे नियोजन करत आहोत. त्यासाठी रजिस्ट्रेशन करताना आपला उपवास आहे किंवा नाही हे नमूद करावे ही विनंती. तसेच आपल्या कुलसंमेलनामध्ये आपण एक नाट्यसंगीताचा बहारदार कार्यक्रम आयोजित करीत आहोत, सदर कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता हॉल वरच असणार आहे, कार्यक्रम संपल्या वर स्नेहभोजन आयोजित केलेले आहे..
संमेलन शुल्क प्रति व्यक्ती रु.५००/- ठरविण्यात आले आहे. १० वर्ष वयोगटापर्यंत संमेलन निःशुल्क असेल, मात्र १० वर्षावरील प्रत्येकास संपूर्ण शुल्क द्यावे लागेल. जास्तीत जास्त बापट कुटुंबियांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा या उद्देशाने शुल्क कमीत कमी ठेवले आहे. रु.५००/- मध्ये रविवार सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा व रात्रीचे जेवण समाविष्ट आहे. ज्यांना हॉटेल / लॉज ची व्यवस्था हवी असेल त्यांना ती स्वखर्चाने करावी लागेल. एकदा शुल्क भरल्यानंतर कोणत्याही कारणास्तव शुल्क परत दिले जाणार नाही. इच्छुकांनी संमेलन शुल्क लवकरात लवकर भरावे, जेणेकरुन आयोजकांना पुढील नियोजन करणे सोपे होईल ही नम्र विनंती.